थरथरत्या बुबुळांपाशी ..! (भाग - २)

थरथरत्या बुबुळांपाशी ...! (भाग १)

-----
(भाग - २)

कसारा अँड इगतपुरी आर नोन टू बी हाँटेड. खूप आधीपासून ऐकत आलोय हे. पण या परिसरातले बरेच किल्ले केले आहेत. त्यावेळी असं कधी वाटलं नव्हतं. आम्ही बऱ्याचदा ठरवून अमावास्येला सुद्धा गेलोय पण आत्तापर्यंत त्या त्या किल्ल्यावरच्या फक्त वदंता ऐकल्या होत्या. याच्याशिवाय राजमाचीला जातानाचा चकवा, तिकडलेच गावातले रात्री मशाल घेऊन चालणारे रक्षक, तोरण्यावरचं किल्लेदाराचं भूत, मुंजा हे सारं आणि या त्रिंगलवाडी चा चकवा असे अनेक प्रकार फक्त ऐकले किंवा वाचलेच होते.

------------------------------------

पहाटे साडे पाच च्या सुमारास त्रिंगलवाडीला पोहोचलो. याआधीचा संपूर्ण रस्ता निर्मनुष्य होता. इतक्या वेळाने आम्ही कोणा माणसाचं तोंड पाहिलं. जीवात जीव आला. पुढचा रस्ता विचारून घेतला आणि बराच वळसा मारून जैन लेण्यांकडे पोहोचलो. तोपर्यंत व्यवस्थित उजाडलं होतं. किल्ल्यावरून येताना पलीकडल्या गावात उतरायचं हे आधीच पक्कं केलं होतं. तसं चांदवाडीत उतरलो. तिथून अर्धा पाऊण तास चालल्यावर रिक्षा मिळाली. कालच्या विपश्यना केंद्राच्या रस्त्यावरूनच ती इगतपुरीला घेऊन जात होती. काल जिथून डोंगर सोंड शोधायला आम्ही शिरलो होतो तो रस्ता दिसत नव्हता. आजूबाजूचा सगळा परिसर कुंपणाने बंदिस्त होता.

------------------------------------

एस टी स्टँड वरून निघाल्यावर गूगल मॅप परत तो क्रॉस असलेल्या स्मशानाचा रस्ता दाखवत होता. पण आम्ही खूप मोठा लाँग कट घेऊन पुढे निघालो. कसेबसे अजून ३-४ तास काढायचेत हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. २० मिनिटातंच वळसा पूर्ण झाला आणि पुढे एका मोठ्या तळ्याजवळ पोहोचलो. त्या काळोखात तळ्यातलं पाणी मुर्दाड वाटत होतं. लांब कुठेतरी रस्त्याच्या मध्ये काहीतरी चमकल्यासारखं जाणवलं. पण आम्ही बॅटरीच्या प्रकाशात तसंच पुढे चालत राहिलो. मध्ये कुठेही थांबायचं नाही हे ठरलंच होतं. तळ्याच्या मध्यापर्यंत आल्यावर मागून कोणीतरी चालत येत असल्याचा भास होत होता. पावलं पटापट टाकायला सुरुवात केली. तसा मागचा चालण्याचा आवाज पण वाढला. मागे बघायची हिम्मत नव्हती. जिथे चमकल्या सारखं वाटत होतं तिथे पोहोचलो. कोणत्यातरी मोठ्या प्राण्याचं मांस तिकडे पडलं होतं. केवळ मांस. बाकी कसलाच पत्ता नव्हता. गावाकडे वेशीबाहेर देणं असतं तसला काहीसा प्रकार होता तो. मागून येणारा आवाज आता कमी झाला होता. आता तो आमच्या भोवतीच घुटमळत होता. तो  कुत्रा होता.

------------------------------------

विपश्यना केंद्राच्या कचाट्यातून सुटून परत इगतपुरी रेल्वे स्टेशन ला आलो. आदित्य टप्परवेअरची बाटली याच वेळी स्टेशन बाहेर विसरला जी तिकडच्या रिक्षा वाल्यांनी जपून ठेवली होती आणि नंतर शोधकार्य सुरू असताना परत केली.

मी नेहमी हॉरर पिक्चर बघताना हसायचो. यांना काय गरज पडल्ये -  छान झोपायचं सोडून आवाज येतोय तिकडे जायची. पण असं होत नाही. आपण त्या गोष्टीत गुंतत जातो आणि वेळेत भानावर नाही आलो तर पुरते अडकण्याची शक्यता असते.

------------------------------------

इगतपुरी रेल्वे स्टेशन वरून बाहेर पडल्या पडल्या एका रिक्षा वाल्याला विचारलं, त्रिंगलवाडीला जाणार का ? ५०० रुपये उत्तर आल्यावर आम्ही नाद सोडला. आणि विपश्यना केंद्राच्या प्रवेशद्वारापाशी जायला निघालो.
सापाची कात दिसल्यावर सुद्धा पुढे चालत राहिलो. तसंही सापाची कात काही आमच्यासाठी  नवीन नव्हती.  पुढे एकंच स्ट्रीट लाईट होता. शेवटचा. आणि तो लुकलुकायला लागला. गूगल मॅप्स प्रमाणे आम्ही विपश्यना केंद्राच्या प्रवेशद्वारापाशी जवळ जवळ आलोच होतो. पुढे दूर दूर पर्यंत प्रकाश नाही. मागे लुकलूकणारा दिवा आणि वरती असंख्य स्वयंप्रकाशित तारे. भल्या एकादशीला पण आकाशात चंद्र का दिसत नाही हा एक प्रश्न मनाला त्रास देत होता.
डोंगरसोंड समोर-डावीकडे-उजवीकडे कुठेच दिसत नव्हती. उजवीकडे एक पायवाट दिसली ती धरली आणि झाडीत शिरलो. आम्ही जे काही बघत होतो ते कोणीतरी मुद्दाम भासवतंय असं वाटत होतं.  एका वेगळ्याच दुनियेत वावरतोय, एरवीच्या जगाशी कोणीतरी आपल्याला तोडू पाहतंय, एक वेष्टन आपल्या भोवती आहे आणि ते आपल्याला त्याला हवंय तसं जग दाखवतंय असं काहीसं वाटायला लागलं. ती सापाची कात आपल्याभोवती आलेल्या बंदिस्त आच्छादनाबद्दल काहीतरी सांगत असावी बहुतेक. बऱ्याच पुढे जाऊन सुद्धा काही क्लू मिळेना. परत उलटा रस्ता धरला आणि बऱ्याच प्रयत्नानंतर विपश्यना केंद्राच्या प्रवेशद्वारापाशी आलो. तो शेवटचा दिवा लख्ख प्रकाश देत होता. तिथे सापाची कात परत दिसली नाही. पुढे मधल्या  गल्ल्यांमधून बांधकाम सुरू असलेल्या इमारती पाशी पोहोचलो. ती चेहरा नसलेली निर्विकार आकृती नक्की काय सांगायचा प्रयत्न करत होती ते काही कळलं नाही. तिच्याप्रमाणे आम्हीही एकटक त्या आकृतीकडे बघत होतो. पण कुत्रांच्या रडण्याने अचानक आम्ही भानावर आलो. आकाशात चंद्र दिसायला लागला. आजूबाजूच्या कुत्र्यांनी त्यांच्या साऱ्या मित्रमंडळींना जागं केलं. आता इगतपुरी स्टेशन आणि तिथून एस टी स्टँड येईपर्यंत त्या भुंकण्याचा त्रास होत नव्हता उलट आपल्या बरोबर कोणीतरी आहे अशी सोबत वाटत होती.

------X----------X-----------X------

(विखुरलेले बिंदू जोडणं बऱ्याच  वेळा आपण टाळतो. असं नाही की आपल्याला जोडायचे नसतात. काही वेळा लक्षात येत नाही पण काही वेळा आपण धजावत नाही. आणि बऱ्याचदा  अज्ञानातंच सुख असतं.)

Comments

Popular posts from this blog

इंद्रवज्र - Indravajra

Tryambakgad (Brahmagiri) - Harihargad. - त्र्यंबकगड (ब्रह्मगिरी) - हरिहरगड

Kalavantin Durg (कलावंतीण दुर्ग) - Way to Heaven