पेब किल्ला - विकटगड
कलावंतीण सुळका सर झाल्यावर लगेच पुढे कुठे जायचं याचा विचार करत करत आणि ३-४ वेळा तारीख पे तारीख करत शेवटी एकदाची तारीख ठरली. ८-९ नोव्हेंबर - पेब किल्ला - विकटगड. पण २ दिवस आधी सगळेच cancel झाले आणि मी, तेजस आणि मयुर एवढेच उरलो. ३ च जण म्हणून मयुर नको म्हणत होता. पण अचानक प्लान ला कलाटणी मिळाली. अक्षय मोरे नामक सद्गृहस्थ 'जर रात्रीचा ट्रेक नसेल म्हणजेच एका दिवसात जाऊन येणार असाल तर मी येतो' या अटीवर तयार झाला. त्याच्या घरी रीतसर त्याच्या आईने माझा interview सुद्धा घेतला. आणि रात्रीचा ट्रेक असल्याशिवाय कुठेही न जाणारे आणि कोणतंही नाव न सुचल्याने स्वतःला "इकडून तिकडून अचानक भयानक ट्रेकर्स" असं नामाभिधान लावणारे आम्ही सकाळी जायला तयार झालो . असो. त्याआधी राहुल घडशी (सोमवारी परीक्षा असल्याने आला नाही ) नावाच्या त्यागी माणसाची वाक्य आठवतात - "तुम्ही रविवारीच जा माझ्यासाठी तारीख बदलू नका ".
आणि मग तो दिवस उजाडला. दादर हून ६.३० ची कर्जत फास्ट लोकल पकडायची असं ठरलं. म्हणून सर्वांना ५.३० ला चर्नी रोड ला जमायला सांगितलं. आणि चक्क ५.३० ला सगळे चर्नी रोडला हजर झाले. आणि मला फोन केला. लगेच घरून निघालो आणि आम्ही ५.३७ ची विरार फास्ट पकडली . ६ च्या आधीच दादर ला पोहोचलो. पाउण तास वाट बघितल्यावर कर्जत फास्ट मध्ये चढलो. ठाण्यानंतर थोडी पेटपूजा केली. आणि ८ वाजायच्या सुमारास नेरळला पोहोचलो. नेरळ स्टेशनच्या बाहेर परत पेटपूजा केली आणि चालायला लागलो.
साधारण इतर ठिकाणी पेबला जायची माहिती मिळते तिथे नेरळ स्टेशन वरून उजवीकडे वळून पुढे पोल्ट्री फार्म , मैदान वगैरे खुणा सांगितल्या आहेत. पण तसं न जाता आम्ही स्टेशन वरून डावीकडे वळलो. शिवाजी महाराजांचा पुतळ्याकडून उजवीकडे परत लगेचच उजवीकडे गेल्यावर शिवाजी मैदान आणि जिजामाता तलाव दिसतो. तिथून मुख्य रस्त्याला आलं कि समोरच गणेश घाट आहे. गणेश घाट ओलांडल्यावर सरळ पायवाट दिसते त्याने पुढे गेल्यावर एक मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूने जायला पायवाट आहे. हि पायवाट पुढे डांबरी रस्त्याला मिळते. इथे डावीकडे वळल्यावर समोर इलेक्ट्रिक टॉवर च्या दिशेने आम्ही चालायला लागलो.
खालूनच आपल्याला कुठे पोहोचायचं आहे ते बाकीच्यांना दाखवलं. पुढे टॉवरच्याच बाजूने जायला पायवाट आहे. आपण ज्याच्या बाजूने जातो असा पहिला टॉवर. पुढे नदीवरचा पूल लागतो. पुलाच्या लगेच पुढे डावीकडे जाणारी पायवाट आहे. पुढे थोडा चढ आहे. हा चढ चढल्यावर पठार आहे. तिथे दुसरा टॉवर लागतो. तिथे जरा फोटो काढून झाल्यावर आम्ही पुढे चालायला लागलो. पुढे सिमेंटचा पाया असलेला टॉवर आहे. तिथे आम्हाला वाट चुकून हताश मनाने घरी जाणारी ३ मुलं भेटली, त्यांनी आम्हाला नक्की रस्ता माहित आहे का म्हणून विचारलं. मी आधीच दोनदा पेबला जाऊन आलेलो असल्याने "हो ssss" असं सांगून टाकलं. तेजस आणि मयुर यांना माझ्यावर विश्वास नव्हता. त्यांना आधी आलेल्या अनुभवातून त्या ३ मुलांना त्यांनी नकळतपणे "या माणसावर विश्वास ठेवू नका" असा सल्ला द्यायचा निष्फळ प्रयत्न केला. अक्षयचा पहिलाच ट्रेक असल्याने तो जरा शांतंच होता.
तसंच पुढे चालत गेल्यावर परत एक पठार लागतं. तिथे दगडांवर बाणांनी खुणा केल्या आहेत. तसं आम्ही पुढे गेलो. नंतर १ तास पुढे गेल्यावर माझ्या लक्षात आलं कि आपण रस्ता चुकलोय. पण मी ते बोललो नाही. तिथेच रेंगाळत बसलो. नको त्या ठिकाणी जाऊन क्लायम्बिंग करायची इच्छा पूर्ण केली. तेजस सुद्धा माझ्या बरोबर होता. मग उतरतानाची तारांबळ आठवून अजूनही हसायला येतं. एवढं सगळं होईपर्यंत त्या तिघांना एव्हाना लक्षात आलं होतं की रस्ता चुकलाय. ते तिघे परत उतरून गेले. मनातल्या मनात मला किती शिव्या दिल्या असतील देवास ठावूक.
मग परत आम्ही खाली उतरलो. पाठारापाशी आलो. तोपर्यंत ११.३० वाजले होते. तिथे १५ मिनिट बसलो आणि परत चढायला सुरुवात केली. तसेच आम्ही परत वर जात होतो. आणि १५ मिनिटांनी आम्ही रस्ता कुठे चुकलो ते माझ्या लक्षात आलं. आम्ही ओढा चढून गेलो होतो. त्याऐवजी समोरच वाट होती. त्या वाटेने पुढे गेल्यावर एक मोठा झाड दिसलं. तिकडे फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
वाटेत आजूबाजूला गुडघ्याच्या वर पर्यंत झुडपं वाढली होती. आणि काटेरी झाडं पण बरीच होती. त्यांना बाजूला सारत मजल दरमजल करीत एकदाचे रस्त्यावरून जो V आकार दिसत होता तिथपर्यंत पोहोचलो. घशाला खूपच कोरड पडली होती. ४ जणांनी मिळून ४ लिटर पाणी केव्हाच संपवलं. पुढे लागेल म्हणून उरलेली बाटली काढली नाही.
तिथून डावीकडे चालायला सुरुवात केली. उजवीकडे दरी असल्याने अक्षयला भीती वाटत होती. आधी त्याने ती चेहेऱ्यावर दाखवली नाही. पुढे एक सोपासा दगड (rock patch) चढून जावा लागतो. तो सहजरीत्या चढल्यावर अक्षयची भीती दिसायला लागली. तो अक्षरशः थरथर कापत होता. दोन मिनिट तिथे बसलो आणि पुढे जायला सुरुवात केली. १५-२० मिनिटातंच गुहा दिसल्या. गुहेत भिंतीवर स्वामी समर्थांचं मोठं चित्र आहे. छत्रपति शिवरायांचा अर्धाकृती पुतळा आहे. साई बाबांचं सुद्धा चित्र आहे. भिंतीवर वेगवेगळी स्तोत्रं आणि वेगवेगळ्या आरत्या लिहिलेल्या आहेत. गुहा प्रशस्त आहेत. ५० पेक्षा जास्त लोक सहज मावतील.
जवळ जवळ पाउण तास थांबलो तिथे. जे काही आमच्याकडे होतं ते खाल्लं. नावापुरत पडलो आणि पुढे निघालो लगेचच तटबंदी वर चढण्यासाठी एक शिडी लागली. अक्षय आणि मयुर शिडीने चढले तर अत्यंत उत्साही तेजस तटबंदीच्या बाजूने चढून गेला. त्याच्या पाठोपाठ मीही गेलो. अक्षय शिडीवर चढताना सुद्धा कापत होता. तटबंदीच्या उजवीकडे एक टाकं आहे. मयुर ने त्यातलं हिरव पाणी पिउन पाणी परीक्षण करून पाणी चांगलं असल्याची ग्वाही दिली आणि मग आम्ही पाणी भरून घेतलं टाक्यात रंगीत गप्पी मासे होते. ते पकडायचा असफल प्रयत्न करून आम्ही पुढे चालते झालो.
पुढे काही दगडी पडके अवशेष दिसले. आणि वरती बघितल्यावर ध्वजस्तंभ दिसला. त्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. खूपच उभा चढ चढून आम्ही मंदिर सदृश्य अश्या ठिकाणी पोहोचलो. तिथे पादुका होत्या. हेच पेब किल्ल्याचा सर्वात उंच ठिकाण, हा भाग गुजरातेतील गिरनार पर्वतावर जिथे दत्तगुरू प्रकट झाले असं म्हणतात त्यासारखा दिसतो. म्हणून याला 'प्रतिगिरनार' सुद्धा म्हणतात.
तिथे अलीकडेच काम सुरु आहे. प्रत्येक वेळी जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा आधीपेक्षा काहीतरी सुधारणा जाणवली. २.३० वाजले होते. आजूबाजूच्या मनमोहक अश्या देखाव्याचे फोटो काढले. विविध प्रकारची फोटोग्राफी सुरु झाली.
नेहमीच्या प्रथेप्रमाणे छत्रपति शिवरायांचा , धर्मवीर शंभूराजेंचा , भारतमातेचा, भगव्या ध्वजाचा आणि हिंदू धर्माचा जयजयकार करून आसमंत दणाणून सोडून परतीच्या प्रवासाला लागलो. जाताना माथेरान च्या वाटेने जायचं ठरवलं होतं तस उतरायला सुरुवात केली. आश्रमाकडून खाली उतरून डावीकडे शिवमंदिर जरा लांबूनच पहिल. जवळ गेलो नाही कारण तिथे मर्कटलीला सुरु होत्या. मागे येवून खाली उतरायला सुरुवात केली. पुन्हा दोन शिड्या लागल्या. अक्षय घाबरतोय हे बघून तेजस आणि मयुर ने आधीच त्याला त्रास द्यायला सुरवात केली होती. आता ते तो उतरताना शिड्या हलवत होते. अक्षय मात्र काही न बोलता शांतपणे उतरत होता. पुढे माथेरान आणि पेब यांच्या मधल्या भागात पोहोचलो दोन्ही बाजूला दरी. एकदम मस्त वाटलं. माथेरानला जायचा रस्ता हा त्यामानाने सोप्पा आहे. वाटेत ३ ओघळ लागतात. पावसाळ्यात आलो होतो तेव्हा तिथे पाणी प्यायलो होतो. पुढे अजून एक छोटीशी शिडी आहे.
शिडीच्या थोडं पुढे गेल्यावर दगडी पायर्या आहेत. त्या चढून वर आल्यावर आपण नेरळ- माथेरान रेल्वे रुळांवर पोहोचतो.
१५८ १५९ nm पासून उजवीकडे चालत गेल्यावर लगेचच कड्यावरच्या गणपती दिसतो. त्याचा दर्शन घेऊन पुढे निघालो.
वीस-पंचवीस मिनिटात माथेरानच्या taxi stand जवळ पोहोचलो. आणि ७० रुपये सीटनुसार माथेरान हून नेरळला टाकशी ने आलो … अक्षयची छळवणूक शेवटपर्यंत सुरु होती. छ. शिवाजी टर्मिनस ला जाणारी ५.३६ ची लोकल पकडली आणि पुढच्या ट्रेक साठी प्लानिंग करायला सुरवात केली ………… ……
Comments
Post a Comment